Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh | मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध 2024
Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh: नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्या या क्रांतीकारी उपकरणाचे फायदे व आरोग्यावर होणारे तोटे सांगीतले आहे.मोबाईलमुळे मानवी जिवनात काय बदल झाले व त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहीती सांगीतली आहे चला तर मग सुरू करूया निबंधाला .
माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये स्मार्टफोन म्हणजेच मोबाईलचा शोध हा सर्वांत महान शोध म्हणावा लागेल. पुराणकथेतील वामनाने साडेतीन पावलांमध्ये सर्व विश्व पादाक्रांत केल्याचे सांगितले जाते. पण मोबाईलच्या इवल्याशा उपकरणाने एका पावलात अक्षरशः संपूर्ण जग पादाक्रांत केले आहे. आज श्रीमंतांपासून ते गरीबलोकांपर्यंत अक्षरशः सर्वांच्या खिशात हा मोबाईल असतो. या मोबाईलशिवाय हल्ली कोणाचे पानही हलत नाही.
या मोबाईलने अल्पावधीतच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. सर्व लोक या मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत. कोठेही जा, लोक मोबाईलवरून कोणाशी ना कोणाशी तरी सतत बोलत असतात. गाडीतून उतरल्यावर, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना, इतकेच नव्हे, तर घरी आल्यावरही सतत कोणाशी तरी बोलत असतात. सतत बोलण्यात गुंतल्यामुळे बोलणाऱ्याचे भोवताली लक्षच नसते. यामुळे अनेकदा अपघात होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बोलणाऱ्याचे भोवतालच्या माणसांकडे लक्ष नसते.
आपली मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील माणसे यांच्याशी जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या इतर व्यक्तींपासून दुरावत चालला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होत आहे. व्यक्तीला निवांतपणे स्वत:कडेही पाहायला वेळ राहिलेला नाही. आजकाल मोबाईलमध्ये गेम खेळने नेहमीची गोष्ट झाली आहे. त्यातच PUBG (Player Unknown’s Battle grounds.) या गेमने धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्यामुळे त्यांंच्या अभ्यासाकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
मोबाईलमुळे शारीरिक दुष्परिणामही होतात. हे उपकरण सतत कानाला लावून ठेवल्यामुळे विशिष्ट इलेक्ट्रॉनिक किरण मेंदूवर विपरीत परिणाम करतात. त्याचबरोबर माणसातील विकृतीला खूप वाव मिळू लागला आहे. इतरांना वाईटसाईट SMS, WhatsApp करणे , बदनामीकारक मजकूर पाठवणे हे सर्रास घडत आहे. परीक्षेतील गैरव्यवहारांसाठी या उपकरणाचा उपयोग विदयार्थी खूप चतुराईने करत आहेत.
‘गणपती दूध पितो’ यांसारख्या अंधश्रद्धात्मक अफवा मोबाईलमुळेच जगभर पसरतात. भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीही या उपकरणाचा उपयोग गुन्हेगारांनी केल्याचे उघड झालेले आहेच. हे सर्व पाहिले की, हा मोबाईल शाप तर नाही ना, असे मनात आल्यावाचून राहत नाही.
मात्र मोबाईलला शाप म्हणणे खुपच एकांगी होईल. वास्तविक पाहता,मोबाईल हे संपर्काचे उत्कृष्ट माध्यम आहे. आपण कोणाशीही, कधीही आणि अक्षरश: जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी कुठूनही संपर्क साधू शकतो. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना, माझा देश कसा, तर “सारे जहाँ से अच्छा” असे या मोबाईलमुळेच सांगू शकला.
आपण कोणाशीही चटकन संपर्क साधू शकत असल्यामुळे आपली कामे भराभर होऊ शकतात. विदयार्थ्यांनाही लहानसहान शंकांचे निरसन करून घेण्यासाठी हे साधन खूप उपयुक्त ठरते. यामुळे अभ्यासाचा, कामांचा वेग वाढला आहे. वेळेचा अपव्यय कमी झाला आहे. आपल्याला हवी असलेली व्यक्ती कामात गुंतलेली असेल, तर आपण एस्एम्एस् पाठवू शकतो. आधुनिक काळातील गतिमान जीवनाशी हा मोबाईल सुसंवादी आहे.
नोकरीवर जाणाऱ्या पतिपत्नींना घरात एकटे असलेल्या आपल्या मुलांशी विडीओ कॉल करून संपर्क साधता येतो. त्यांना काही हवे-नको असल्यास त्यांची काळजी घेता येते. वृद्ध एकाकी व्यक्तींना तर हा फार मोठा आधार बनला आहे. हल्ली मोबाईलवरून आपल्या विविध बिलांची माहिती मिळते. बातम्या, चित्रपट तर केव्हाच सुरू झाले आहेत. नाटक-सिनेमा, रेल्वे, विमाने यांची तिकिटे मोबाईलवरून खरेदी करता येऊ शकतात.
दूरदर्शन आकाशवाणीवरील कार्यक्रमांमध्ये या मोबाईलमुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. हल्ली कित्येक गुन्हयांचा उलगडा मोबाईलमुळे झाल्याचे दिसून येते. एके ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या व्यक्तीचा मोबाईल वाजला आणि त्याचा जीव वाचवणे अग्निशमन दलाला शक्य झाले ! मोबाईलचे फायदे किती सांगावेत ! तोटे आहेतच, पण तो त्या उपकरणाचा दोष नव्हे. हे उपकरण वापरणाऱ्या माणसाचा तो दोष आहे. तेव्हा या दूरसंचाराला – मोबाईलला – शाप कसे म्हणणार?
मित्रांनो तुम्हाला Phone shap ki vardan marathi nibandh हा कसा वाटला हे कमेंट करून शांगु शकता, तुम्ही मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी कोणते उपाय उपयोगात येतील हे सांगु शकता यामुळे आमच्या इतर वाचकांना तुमच्या सल्याचा उपयोग होऊ शकेल, धन्यवाद .
महत्वाचे मुद्दे :
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- भ्रमणध्वनीचा (स्मार्टफोन) शोध हा एक महान शोध
- खूप दुष्परिणाम
- दूरध्वनीवर सतत
- बोलत राहणे
- भोवतालापासून तुटलेपण
- SMS चे खूळ-वाईट उपयोग
- बदनामीसाठीही
- अंधश्रद्धा पसरवण्यासाठी
- परीक्षेतील गैरव्यवहार वाढण्यास मदत
- बॉम्बस्फोट
- परंतु खूप उपयुक्त
- कोणाशीही, कुठेही, कधीही संपर्क
- कामाचा वेग वाढला
- वेळेचा अपव्यय कमी
- शाळकरी मुले व वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी
- अडचणींच्या वेळी तर देवदूतच
- गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी
- चांगले-वाईटपण वापर करणाऱ्यावर अवलंबून.
हे देखील वाचा
खूप छान लिहिता